नवी दिल्ली - काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपच्या तक्रारीवरून त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे प्रियंका गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाने प्रियांका गांधींना १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. प्रियांकाने नुकतेच एका रॅलीदरम्यान पंतप्रधानांवर टीका केली होती.
निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, "आयोगाला भारतीय जनता पक्षाकडून १०.११.२०२३ रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे (प्रत संलग्न जोडली आहे. मध्य प्रदेशच्या सांवेर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करताना, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत खोटे, चुकीची विधाने केली आहेत, ज्यात जनतेची दिशाभूल करण्याची आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रियंका गांधींवर भाजपाकडून करण्यात आला आहे.
काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?
'मोदीजी, हे BHEL होतं, जिथून आम्हाला रोजगार मिळत होता, ज्यातून देशाची प्रगती होत होती, तुम्ही त्याचे काय केले, कोणाला दिले, तुम्ही कोणाला दिले, का दिले? तुमच्या मोठ्या उद्योगपती मित्रांना का दिले असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला होता.
नोटीसमध्ये निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "सर्वसाधारणपणे, एखाद्या ज्येष्ठ नेत्याने, राष्ट्रीय पक्षाच्या स्टार प्रचारकाने दिलेली विधाने खरी आहेत असा जनतेचा विश्वास आहे. अशा परिस्थितीत, नेता जे विधान करेल त्या विधानांना माहितीपूर्ण आणि तथ्यात्मक आधार असावा अशी अपेक्षा असते. जेणेकरून मतदारांची दिशाभूल होण्याची शक्यता नाही.