लखनौ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पुन्हा सुरू झाली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी राज्यातील यात्रेच्या अंतिम टप्प्यात सामील झाल्या. या यात्रेत पहिल्यांदाच गांधी भाऊ बहीण एकत्र दिसले. ही यात्रा अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलीगढ, हाथरस, आग्रा यामार्गे जात राजस्थानच्या धोलपूर येथे रविवारी मुक्काम करेल. यात्रा मुरादाबादच्या विविध भागांतून जात असताना लोकांनी ‘राहुल गांधी जिंदाबाद’, ‘प्रियंका गांधी जिंदाबाद’ आणि ‘काँग्रेस पक्ष जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
दोन्ही काँग्रेस नेते उघड्या जीपमधून लोकांना अभिवादन करत होते. प्रियांका उत्तर प्रदेशातील चंदौली येथून यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव रविवारी आग्रा येथून यात्रेत सामील होणार आहेत. लोकसभेसाठी दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशात जागावाटप अंतिम केल्यांनतर अखिलेश यात्रेत येत आहे. काँग्रेसने स्पष्ट केले की, २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान यात्रेला विश्राम असेल, जेणेकरून राहुल यांना २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात दोन विशेष व्याख्याने देता येतील. या काळात ते नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांनाही हजेरी लावणार आहेत. ही यात्रा २ मार्च रोजी दुपारी २ वाजता राजस्थान येथील धोलपूरमधून पुन्हा सुरू होईल.
राहुल गांधी यांची याचिका फेटाळलीरांची : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणी प्रकरणातील तक्रार रद्द करण्यासाठी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी शाह यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी भाजप नेते नवीन झा यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी याचिकाकर्ते व राहुल गांधी यांना ४ फेब्रुवारीला न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश दिले. कनिष्ठ न्यायालयाने आपली भूमिका ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, यासाठी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.