ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले गेले आहे. मात्र असे असतानाच सत्ताधारी समाजवादी पक्षात अखिलेश- मुलायम यांच्या वादामुळे ' यादवी' माजली होती. मात्र अखिलेश यांनी संख्याबळाच्या जोरावर कुरघोडी केली असून आता काँग्रेसशीही आघाडी केली आहे. सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली. मात्र ही आघाडी होण्यासाठी प्रियांका गांधी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भाजपाने ' काँग्रेसमुक्त भारता'चा नारा दिला असून काँग्रेसला हरवण्यासाठी त्यांनी कसून तयारी केली. मात्र काँग्रेस पक्षही हार मानणा-यांमधील नसून त्यांनी विजयासाठी कंबर कसली असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी 'सपा'शी हातमिळवणी केली. सपा व काँग्रेस यांची युती व्हावी, म्हणून दोन्ही बाजूंनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र दोन्ही पक्षांदरम्यान जागा वाटपावरून बरीच ओढाताण सुरू होती. जागा वाटपाची कोंडी दूर होण्याची शक्यता दिसत नसल्याने, राष्ट्रीय पक्षाची आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारीही चालवली होती. अखेर उत्तर प्रदेशात भाजपचा महामेरु रोखण्यासाठी काँग्रेस आणि सपाने युती केली.
या सर्व घडामोडींमध्ये प्रियांका गांधी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मुख्य बाब म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही या ट्विट करत वृत्ताला दुजोरा दिली आहे. 'समाजवादी पक्षासोबत युतीसंदर्भातील चर्चेसाठी काँग्रेसकडून कुणीच मोठा नेता सहभागी नव्हता, असे म्हणणे अयोग्य ठरेल. सपा सोबतच्या चर्चेमध्ये वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता. काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी महासचिवांसोबतच प्रियांका गांधीही या चर्चेत सहभागी झाल्या होत्या,' असे पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश (निवडणूक) साठी प्रियांका गांधीच काँग्रेसच्या रणनीतीकार आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.