नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज काँग्रेसने दिल्लीतील राजघाटवर 'संकल्प सत्याग्रह' केला, ज्यात पक्षाचे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत 'या देशाचा पंतप्रधान भित्रा आहे, लाज बाळगा, माझ्यावर केस टाका.. पण वास्तव हे आहे की या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत,' अशी घणाघाती टीका केली.
'राहुलला पप्पू म्हणतात...'राहुल गांधींचा उल्लेख करत प्रियंका गांधी म्हणाल्या, 'हा माणूस देशातील जनतेचा आवाज उठवत आहे. तो म्हणतोय गरीब, तरुण आणि महिलांना त्यांचा हक्क द्या. तुमचा अधिकार तुमच्याकडे गेला पाहिजे. हे राहुल गांधींबद्दल नाही, तर संपूर्ण देशाबद्दल आहे. राहुल गांधी यांनी जगातील दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे हार्वर्ड आणि केंब्रिजमधून पदवी आहेत.'
'राहुल गांधींनी क्रेंब्रिजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी(एमफिल पदवी) मिळवली आहे आणि तुम्ही त्यांना पप्पू बनवता...तुम्ही पदवी पाहिली नाही, सत्य पाहिले नाही आणि त्याला पप्पू बनवले. मग हा पप्पू प्रवासाला निघाला आणि तेव्हा यांना कळलं की, हा पप्पू नाही. त्याच्यासोबत लाखो लोक फिरत आहेत. तो प्रामाणिक आहे, त्याला सर्व गोष्टी समजतात, तो लोकांमध्ये जातो. आज जनता त्याच्यासोबत आहे. संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
अहंकारी राजा...प्रियंका पुढे म्हणाल्या, 'जेव्हा गर्विष्ठ हुकूमशहा उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा ते पूर्ण शक्तीने जनतेला दाबण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे सरकार एका माणसाला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का करत आहे? या अदानीमध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे तुम्ही देशाची सर्व संपत्ती देत आहात. कोण आहे हा अदानी, ज्याचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसतोय. अहंकारी राजाला जनताच उत्तर देणार. आज हा देश मनातून बोलतोय, सत्य ओळखतोय. आज तो दिवस आहे, आजपासून सर्वकाही बदलण्यास सुरुवात होईल,' असंही त्या म्हणाल्या.