रामपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार जाहीर सभेदरम्यान अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना आज मंचावर अस्वस्थ स्थितीला सामोरे जावे लागले.
'कुठे गेले, हद्द झाली!'रामपूरच्या निवडणूक रॅलीत प्रियांका गांधी आपल्या पक्षासाठी मतं मागण्यासाठी मंचावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आपला उमेदवार दिसला नाही, तेव्हा त्या चिंतेत दिसून आल्या. त्यांना आधी वाटलं इथेच कुठेतरी असतील, पण बराच वेळ काँग्रेस उमेदवार एकलव्य पोहोचले नाहीत. तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, कुठे गेले…अरे कुठे गेले, हद्द झाली!
काही वेळानंतर उमेदवार मंचावरथोड्या वेळाने उमेदवार एकलव्य मंचावर आले, तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, 'कमाल आहे'. त्याचवेळी हात जोडून शाहबाद मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार एकलव्य यांनी प्रियंका गांधी यांना हात जोडून नमस्कार केला.
रामपूरमध्ये प्रियंका गांधींचे स्वागतदरम्यान, प्रियंका गांधी यांचे रामपूरमध्ये आगमन होताच रामपूर शहर विधानसभेचे उमेदवार नावेद मियाँ आणि बेगम बानो यांनी त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात त्यांना शाहबाद मतदारसंघाचे उमेदवार एकलव्य यांचीही भेट घ्यायची होती. एकलव्य यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रियंका गांधींच्या रोड शोचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे एकलव्य यांना रामपूर शहरात येऊन त्यांच्या ताफ्यासह जायचे होते.
काँग्नेसच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही - पंतप्रधान मोदीदुसरीकडे, उत्तर प्रदेश विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारनपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. हिवाळ्यात सकाळी लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत,याचा मला आनंद आहे. या सर्व मतदारांचे मी कौतुक करतो. भाजप यूपीचे 'घोषणा पत्र' हा कल्याणाचा ठराव आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. ते म्हणाले, "मी आजकाल पाहतोय की काही अत्यंत कुटुंबवादी लोक जनतेला सतत पोकळ आश्वासने देत आहेत. मात्र त्यांना माहीत आहे की, त्यांचे जुने कारनामे आठवून उत्तर प्रदेशातील जनता त्यांना पुन्हा कधीही येऊ देणार नाही. त्यांच्या नशिबात सत्ता लिहिलेली नाही, उत्तर प्रदेशच्या जनतेने त्यांना नाकारले".