नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांमध्ये भीती उरली नसून ते खुलेआम फिरत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबावर वर्षभरापासून अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. मात्र आरोपीचे कुटुंब भाजपशी निगडीत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
शनिवारी प्रियंका गांधी यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची उन्नाव येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, पीडित कुटुंबाशी मी चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले असून, खूप वाईट घटना घडली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबावर वर्षभर अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. कुटुंबातील महिलांना धमकावल्याचा आरोप प्रियंका गांधीनी केला.
कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली. अशा प्रकारे कुटुंबाचा छळ होत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी लावला. तर हे सर्व कसे घडत आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा. तसेच योगी सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.
प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर ट्विटर हैंडलवरून ट्वीट करत योगी सरकारवर टीका केली आहे. या दुःखाच्या घटनेत पीडितेच्या कुटूंबाला धीर देण्याची मी देवाकडे प्रार्थना करते. त्यांना न्याय न मिळणे हे आपल्या सर्वांचे अपयश आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्व दोषी आहोत. मात्र हे सर्व उत्तर प्रदेशमधील पोकळ झालेली कायदा व सुव्यवस्था देखील दर्शवते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
आरोपीचे कुटुंब भाजपशी संबंधित
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी हा गावच्या प्रमुखांचा मुलगा आहे. असे म्हटले जात आहे की त्याचे कुटुंब भाजपशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले जात आहे का ? कारण या आधी सुद्धा असे झाले असल्याचे प्रियंका म्हणाल्या. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप तर होत नाही ना ? याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आरोपींना कोणतेही भीती नसून ते पीडित कुटंबाला सतत धमकावत असल्याचे सुद्धा प्रियंका गांधी म्हणाल्या.