गोरखपूर:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वच पक्ष आता आक्रमक होताना दिसत असून, नेते मंडळींचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षातील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या दंड थोपटून मैदानात उतरल्या असून, योगी आदित्यनाथांचा गड मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये प्रतिज्ञा रॅलीला संबोधित केले. यावेळी बोलताना मृत्यू आला तरी भाजपसोबत जाणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
या सभेत प्रियांका गांधी यांनी भाजपसह सप आणि बसपवर जोरदार निशाणा साधला. प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथांच्या विचाराच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला. ते आरोप करतात की काँग्रेस भाजपला सोबत मिळून काम करतेय. मात्र आपण त्यांना सांगू इच्छितो की, मृत्यू आला तरी भाजपसोबत जाणार नाही, असा पलटवार सप आणि बसपवर केला आहे.
दुर्बिण सोडा आणि चष्मा घाला
प्रियंका गांधी यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली. अमित शाह यांचे वक्तव्य ऐकत होते. उत्तर प्रदेशात गुन्हेगार शोधायचे असतील तर दुर्बिणीची गरज आहे, असे ते सांगत होते. त्यावेळी ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले ते अजय मिश्रा त्यांच्या बाजूला बसलेले होते. मला त्यांना सांगायचे आहे की दुर्बिण सोडा आणि चष्मा घाला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
७० वर्षांची मेहनत ७ वर्षांत वाया घालवली
काँग्रेसने रेल्वे, विमानतळे, रस्ते तयार केले. ते सर्व यांनी विकून टाकले, आणि विचारतात की, आम्ही ७० वर्षांत काय केले. ७० वर्षांच्या प्रयत्नांना यांनी फक्त ७ वर्षांत वाया घालवले, अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यावेळी केली. उत्तर प्रदेशमध्ये ५ कोटी युवक बेरोजगार असून, अनेकजण रोज आत्महत्या करत असल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला.