नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. कोरोना महामारीच्या काळातच या प्रोजेक्टला पर्यावरण संबंधातील सर्व प्रकारची मंजुरी देण्यात आली आहे. यावरूनही प्रियंका यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं असून निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करत पंतप्रधान मोदींसाठी नवीन घर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी एवढा पैसा रूग्णांवर खर्च केला तर बरं होईल असं म्हटलं आहे.
मोदी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "देशातील लोक जेव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल. अशा प्रकारच्या खर्चांमुळे अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे असा संदेश लोकांमध्ये जातो" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा (Central Vista Project) समावेश आवश्यक सेवांमध्ये केला आहे. लॉकडाउन सारख्या निर्बंधांच्या काळातही हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता या कामाला आणखी वेग येईल. महत्वाचे म्हणजे, विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही सरकारने एका निश्चित वेळेत संसद भवन आणि इतर इमारतींचा कायाकल्प करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबरला या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे, त्यांत पंतप्रधान निवासस्थानाचाही (Prime Minister's residence) समावेश आहे. याच वेळेत, पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजीचे मुख्यालयदेखील याच डिसेंबर 2022 च्या निर्धारित वेळेत पूर्ण होईल.
उपराष्ट्रपतींचे निवासस्थानही पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या प्रोजेक्टसाठी जवळपास 13,450 कोटी रुपये लागणार आहेत. तसेच या कामासाठी जवळपास 46 हजार लोक लागतील अशी अपेक्षा आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक सातत्याने या नव्या संसद भवनाच्या निर्माण कार्यावर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. सोशल मिडियावरही लोग कोरोना काळात या इमारतीवर होत असलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या लोकांचे म्हणणे आहे, की देशात रुग्णालय, ऑक्सिजन आणि औषधींचा तुटवडा जाणवत आहे. अशा काळात ऑक्सिजन, बेड तथा इतर आवश्यक गोष्टी जमविण्याऐवजी सरकार या प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे.