Farm laws Repeal: “मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अध्यादेश का काढला नाही?”; प्रियंका गांधींचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:50 PM2021-11-19T13:50:38+5:302021-11-19T13:51:40+5:30
Farm laws Repeal: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अशी विचारणा करत या निर्णयासंदर्भात शंका उपस्थित केली आहे.
नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. यानंतर देशभरात विरोधक आणि शेतकरी आंदोलक जल्लोष करत आहेत. यातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अशी विचारणा करत या निर्णयासंदर्भात शंका उपस्थित केली आहे.
पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना अटक केली जात होती. त्यांची हत्या केली जात होती. मारहाण केली जात होती. तुमचेच सरकार हा अन्याय करत होते. आता मात्र तुम्ही म्हणता कायदे मागे घेतो. मग तुमच्यावर आम्ही विश्वास कसा विश्वास ठेवायचा, तुमच्या नियतीवर विश्वास कसा ठेवायचा, मोदी सरकार यासंदर्भात अध्यादेश काढणार का, अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली.
सत्ताधाऱ्यांना झुकावे लागते हे सरकारला कळले
शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठे नाही, हे उशिरा का होईना पण सरकारला कळले आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी उभे ठाकतात आणि सत्ताधाऱ्यांना झुकावेच लागते हे सरकारला कळले आहे. याचा आनंद आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक एकवटले याचाही आनंद आहे, असे प्रियंका गांधी यांनी यावेळी नमूद केले.
कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही
पंतप्रधान मोदी एकदाही बॉर्डवर गेले नाहीत. शेतकऱ्यांना भेटले नाहीत. हिंसा झाली, हत्या झाली त्या ठिकाणीही ते कधी गेले नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत. मग आज अचानक त्यांना कशी काय जाग आली? निवडणुका येत असल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे, असे सांगत प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का, केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार आहात का, अशी प्रश्नांची सरबत्ती प्रियंका गांधी यांनी यावेळी केली.
दरम्यान, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा एक गटच विरोध करत होता. कृषी अर्थशास्त्रांनी, वैज्ञानिकांनी, जाणकारांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांमधून, बैठकांमधून चर्चा सुरु होती. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना समजून घेण्याचे सर्व प्रयत्न केले. कदाचित आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. शेतकऱ्यांची समजूत घालण्यात कमी पडलो. त्यामुळेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतात जाऊन काम सुरू करावे, एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी केले.