नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
प्रियंका गांधी यांनी सोमवारी (25 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर टीका केली आहे. 'जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय?' असा सवाल प्रियंका यांनी केला आहे. 'भाजपाने महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे, असं टीव्हीवर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यासाठी भाजपा सरकारच्या खिशातून कधी मदत निघाली नाही' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुण आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं. तसेच देशात रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक असल्याची टिकाही केली होती. 'देशात रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळात या आजाराने मोठ्या आजाराचं रूप घेतलं आहे. बांधकाम क्षेत्रात तब्बल 35 लाख लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास 40 लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर आहेत' असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं. तसेच भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुण आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे असं देखील म्हटलं होतं.
महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून, आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालय उद्या त्यावर निर्णय देणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिलेलं आहे.