काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी 5 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील धार येथील मोहनखेडा येथे पोहोचल्या. मध्य प्रदेश ही महापुरुषांची भूमी आहे असं म्हणत त्यांनी जाहीर सभेत आपली आजी इंदिरा गांधी यांची आठवण काढली. "आजी आम्हाला तुमच्या समाजाच्या, आदिवासी समाजाच्या गोष्टी सांगायची. इंदिरा गांधींना तुमच्या संस्कृतीबद्दल आदर होता" असं म्हटलं आहे. तसेच भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार तुम्हाला कमकुवत करत आहे. मध्यप्रदेशात 250 हून अधिक घोटाळे झाले आहेत. गेल्या 18 वर्षात राज्यात फक्त घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला आहे. व्यापम घोटाळ्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याची कोणी चौकशी केली का? यासोबतच प्रियंका गांधींनी ईडीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशात ईडीचे छापे का पडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
"देशातील तरुणाई हे वादळ आहे. तुमच्यासोबत जे काही होत आहे ते चुकीचे आहे. तुम्ही रोज संघर्ष करून जीवन जगत आहात. आम्ही असेही काही तरुण पाहिले ज्यांना दहा वर्षे उलटून गेल्यावर देखील घोटाळ्यामुळे नोकरी मिळालेली नाही. सरकारकडे पेन्शन देण्यासाठी पैसे नाहीत आणि अदानींचे हजारो कोटी रुपये माफ करण्यासाठी पैसे आहेत" असा खोचक टोला प्रियंका गांधींनी लगावला आहे.
प्रियंका म्हणाल्या की, "काही लोकांनी नेत्यांना देव बनवले आहे. मध्य प्रदेशात महागाई शिगेला पोहोचली आहे. मोफत रेशन देणे हे उपकार नाहीत. सरकार शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी नुकसान भरपाई देईल, निवडणुकीनंतर नाही. इंदूर विभागात गेल्या 18 वर्षांत एकही विद्यापीठ किंवा नवीन रुग्णालय बांधलेले नाही. महिलांच्या मतांशिवाय कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही. तुमच्याशी राजकीय खेळ खेळला जात आहे."
प्रियंका यांनी काँग्रेसच्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. राज्यातील रहिवाशांना 100 रुपये प्रति युनिट दराने वीज मोफत मिळणार आहे. गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. शेतकऱ्यांना 5 हॉर्स पावर वीज मोफत मिळणार आहे. जुनी पेन्शन लागू होईल. हा देश तुमचा आहे, राज्य तुमचे आहे. जबाबदारीही तुमची आहे. राज्यघटनेने तुम्हाला अधिकार दिले आहेत. तुमच्या भविष्यासाठी मतदान करा. हे खूप मोलाचे आहे. त्यामुळे काँग्रेसला मतदान करा असं देखील म्हटलं आहे.