लखनऊ - केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सोमवारी प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला होता. त्यावरून साध्वी निरंजन ज्योती यांनी प्रियंका यांना टोला लगावला आहे. 'प्रियंका गांधी यांनी स्वतःचे नाव बदलून फेरोज प्रियंका करावं' असं त्यांनी म्हटलं आहे.
साध्वी निरंजन ज्योती यांनी मंगळवारी (31 डिसेंबर) प्रियंका गांधींवर टीका केली आहे. प्रियंका भगव्या रंगाचा अर्थ समजू शकत नाहीत कारण त्या खोट्या गांधी आहेत. त्यांनी आपल्या नावातून गांधी हटवून ते फिरोज प्रियंका करावं असं साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याने प्रियंका गांधी यांना योगी सरकारचा त्रास वाटत आहे. जर त्या दंगली करणाऱ्यांच्या मागे असतील तर त्यांनी समोर यावे व तसे स्पष्ट करावे असं केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटलं आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी भगव्याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. भगवा रंग हा ज्ञान व आत्मियतेचे प्रतिक असल्याचं देखील म्हटलं आहे.
साध्वी निरंजन ज्योती यांनी प्रियंका गांधी यांना 'ज्यांनी निष्पापांना मारहाण केली व पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाही?' असा प्रश्न विचारला आहे. प्रियंका गांधी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसाचार उसळला होता, त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल प्रियंका गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूडबुद्धीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप केला होता.
'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे. 77 वर्षीय माजी पोलीस अधिकारी दारापुरी यांच्या त्यांच्या घरातून अटक केली. त्यांचे नाव 48 लोकांच्या यादीत आहे. आम्ही राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. भगवे वस्त्र परिधान करतात, ते आम्हाला शांती आणि करूणा शिकवतात. पण, सूडबुद्धीने वागायचे शिकवत नाहीत' असं म्हणत प्रियंका गांधी यांनी योदी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला होता.