नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्ताची लिंक शेअर करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. "उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लघू उद्योगांमध्ये लाखो रोजगार उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र खरं काय आहे ते पाहा" असं म्हटलं आहे.
"पंतप्रधान ज्या मतदारसंघामधून खासदार झाले आहेत तेथील शान असणाऱ्या विणाकाम कामगारांची अवस्था पाहा. या कामगारांना आज दागिने विकून, घर गहाण ठेवून दिवस काढावे लागत आहेत, जगावं लागत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये यांच्याकडे काम नाही. छोटे व्यवसायिक आणि कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. वादळी प्रचार नाही तर आर्थिक मदत देणारे एखादे पॅकेजच त्यांना या संकटातून वर काढू शकतं" असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशातही सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये जुंपली आहे. तिथे भाजपाची सत्ता आहे आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. स्थलांतरित मजुरांसाठी बस सोडण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात बरीच 'तू तू मैं मैं' सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हवं तर बसवर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बससेवा सुरू करा, असा टोला प्रियंका गांधींनी लगावला होता. काँग्रेसने आत्तापर्यंत 67 लाख लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलीय, आमच्या बसेस मजुरांसाठी आजही तयार आहेत, पण योगी सरकार मंजुरी देत नाहीए, असा दावाही त्यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी
CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण