नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सक्रिय झाल्या आहेत. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी पोहोचण्यास प्रियंका गांधी यांना थोडा उशीर झाला. त्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची आठवण करूव देताना आम आदमी पक्षाला टोला लागवला. शीला दीक्षित यांनी उभारलेल्या मेट्रोचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे आपल्याला यायला उशीर लागला. त्यासाठी मी दिलगीर आहे. परंतु, शीला दीक्षित यांनी दिल्लीत सुरू केलेल्या मेट्रोने आले असते तर नक्कीच 10 मिनिटांत येथे येऊ शकले असते, असं प्रियंका म्हणाल्या. दिल्ली देशातील महत्त्वपूर्ण शहर आहे. येथे देशातील सर्वच राज्यांतून लोक येतात. मात्र येथे रस्ता, वाहतूक, पूल आणि पाण्याची व्यवस्था नाही. मागील पाच वर्षांत लक्षात राहिल असं एकही काम दिल्लीत झालं नसल्याची टीका त्यांनी 'आप'वर केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी सातत्याने सभा घेत आहेत. यावेळी त्यांच्या निशान्यावर सत्ताधारी आम आमदी पक्ष आहे. शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या विकासकामांना दिल्लीतील लोक आठवत आहेत. त्यामुळे मतदान करताना विचार करून काँग्रेसला समर्थन द्यावे, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले. तसेच खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही प्रियंका यांनी दिल्लीकरांना दिला.