केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रकचालकांच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा पाठिंबा मिळाला आहे. याच दरम्यान त्यांनी यावरून केंद्रावरही जोरदार निशाणा साधला आहे. बुधवारी (3 जानेवारी) त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. तसेच केंद्राला ड्रायव्हर्सच्या सुविधांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
प्रियंका गांधी यांनी मंगळवारीही अशीच पोस्ट करत ट्रक चालकांच्या संपाबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. केंद्र सरकार जनतेला त्रास देणारे कायदे करत असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. "ड्रायव्हर्स हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीची चाकं आहेत. ते अत्यंत कमी वेतनावर खडतर जीवनशैली जगतात, विविध अडचणींना तोंड देतात. कायदा आणि व्यवस्था त्यांच्याप्रती मानवीय असली पाहिजे."
"प्रत्येक जीव अनमोल आहे. प्रत्येकाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कायद्याचा उद्देश सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य, सुरक्षित आणि न्याय मिळवून देणे आणि लाखो लोकांना यातना न देणे हा आहे. सल्लामसलत न करता आणि विरोधकांना सहभागी न करता एकतर्फी तुघलकी कायदे बनवण्याचे काम थांबवले पाहिजे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने 'हिट अँड रन' (Hit And Run) कायद्यात केलेल्या (Motor Vehicles Act) बदलांविरोधात देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील लोकांचे हाल झाले. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली. यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे.