देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने भाजपावर हल्लाबोल करण्यात येत आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून पुन्हा एकदा फक्त भाजपाच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार निशाणा साधला आहे. "जिथे जिथे भाजपा आणि आरएसएसला भीती पसरवता येईल असं दिसतं, तिथे त्यांनी भीती पसरवली आहे" असं म्हटलं आहे.
"महिलांना महागाईची भीती वाटते, शेतकऱ्यांना काळ्या कायद्याची भीती वाटते, सैनिकांना अग्निवीरची भीती वाटते, विद्यार्थ्यांना पेपर फुटण्याची भीती वाटते, अल्पसंख्याकांना द्वेष आणि हिंसाचाराची भीती वाटते. जेव्हा जेव्हा भाजपा आणि आरएसएसला भीती पसरवता येईल असं दिसतं, तिथे त्यांनी भीती पसरवली आहे. जनतेमध्ये भीती, हिंसा आणि द्वेष निर्माण करून कोणाचाही फायदा होऊ शकत नाही. भाजपाने आता हे राजकारण थांबवावं" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
"राहुल हिंदूंचा अपमान करू शकत नाहीत"
प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर म्हटलं होतं की ते कधीही हिंदूंचा अपमान करू शकत नाहीत आणि त्यांनी भाजपा आणि सभागृहातील त्यांच्या नेत्यांवर भाष्य केलं आहे. अध्यक्षांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधी यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रियंका गांधी संसद भवनात पोहोचल्या होत्या. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच सभागृहात प्रस्तावावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप
भाजपा देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. हे लोक हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसाचारावर बोलतात, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेत भाग घेताना ते म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही.
राहुल गांधींनी भाजपावर हा आरोप केल्यावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला आणि म्हटलं की, काँग्रेस नेत्याने संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटलं आहे. याबाबत विचारलं असता प्रियंका गांधी यांनी संसदेच्या आवारात सांगितलं की, राहुल गांधी कधीही हिंदूंचा अपमान करू शकत नाहीत. ते जे काही बोलले ते भाजपा आणि त्यांच्या नेत्यांबद्दल आहे.