शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते प्रियांका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली. राजघाटावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'माझ्या कुटुंबाने आपल्या रक्ताने या देशातील लोकशाहीचे संरक्षण केले, असं प्रियांका गांधी संकल्प सत्याग्रहादरम्यान म्हणाल्या.
यावेळी प्रियांका गांधी यांनी राजघाटावर एक किस्साही सांगितला. प्रियांका म्हणाल्या की, १९९१ साली माझ्या वडिलांची अंत्ययात्रा त्रिमुर्ती भवनातून निघत होती. माझ्या आईसोबत, माझा भाऊ सोबत आम्ही गाडीत बसलो होतो आणि आमच्या समोर भारतीय सैन्याचा फुलांनी भरलेला ट्रक होता. त्यावर माझ्या वडिलांचा मृतदेह होता. काफिला थोडा अंतरावर गेल्यावर राहुल म्हणू लागला की, मला खाली उतरायचे आहे, तेव्हा सुरक्षेचा मोठा प्रश्न असल्याने आईने नकार दिला. राहुल गाडीतून खाली उतरला आणि सैन्याच्या मागे चालू लागला. भर उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेच्या मागे चालत इथपर्यंत पोहोचला. माझ्या भावाने माझ्या शहीद वडिलांचे अंत्यसंस्कार या ठिकाणापासून सुमारे ५०० यार्ड अंतरावर केले, ते चित्र आजही माझ्या मनात आहे, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
'माझ्या वडिलांचा मृतदेह या तिरंग्यात गुंडाळला होता. त्यांच्या मागून चालत असताना माझा भाऊ इथपर्यंत आला. शहीद वडिलांचा संसदेत अपमान केला जात आहे. तुम्ही हुतात्माच्या मुलाला देशद्रोही म्हणता आणि मिर्झाफर म्हणत त्यांच्या आईचा अपमान करता. तुमचे मंत्री संसदेत माझ्या आईचा अपमान करतात. तुमचे एक मंत्री म्हणतात की, राहुल गांधींना त्यांचे वडील कोण हे माहित नाही, असा आरोपही प्रियांका गांधींनी केला.
'वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा कुटुंबाची पगडी घालतो आणि परंपरा पुढे नेतो. तुम्ही अपमान करता पण तुमच्यावर कारवाई होत नाही, शिक्षाही होत नाही. तुम्हाला संसदेतून कोणी बाहेर काढत नाही. वर्षानुवर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे कोणी सांगत नाही, असा हल्लाबोल केंद्र सरकारवर केला.