राजेंद्र कुमार -लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातून (युपी) लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सध्या त्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना तयार करण्यात व्यग्र असल्या तरी त्यासोबतच त्यांनी युपीतून लढण्याचीही तयारी सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे नेते हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गावोगावी जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. या दोनपैकी एका जागेवर प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाणार आहे.
सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते ही चर्चा फेटाळतात.
काय आहे गणित?त्यांचे म्हणणे आहे की, विधानसभा निवडणुकीत येथील मतदार अन्य पक्षांकडे वळले तरी लोकसभा निवडणुकीत ते पूर्णपणे काँग्रेसच्या पाठीशी असतात. अशा स्थितीत रायबरेलीतून फक्त सोनिया गांधीच निवडणूक लढवतील, असे पक्षाचे नेते गृहीत धरत आहेत. तरीही अपरिहार्य परिस्थितीत सोनिया गांधींनी निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर प्रियांका गांधी येथून उमेदवार असतील.
तसेच मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाकडून दिलासा न मिळाल्यास प्रियांका अमेठीतून निवडणूक लढवू शकतात. या दोन जागांशिवाय पक्षाचे नेते प्रियांकासाठी प्रयागराज व फुलपूर लोकसभा मतदारसंघाचाही पर्याय तपासत आहेत, असे सुत्रांनी सांगितले.