म्हैसूर : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जाहीर सभा घेतल्या. मात्र, ब्रेक दरम्यान त्या डोसा बनवतानाही दिसल्या. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या म्हैसूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये डोसा बनवताना दिसत आहेत.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी कर्नाटक राज्यातील त्यांच्या व्यस्त निवडणूक प्रचारातून ब्रेक घेतला. त्यानंतर त्या म्हैसूरच्या सर्वात प्रसिद्ध मैलारी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी पोहोचल्या. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतर काही जण होते. म्हैसूरच्या सर्वात जुन्या हॉटेल मैलारीमध्ये इडली आणि डोसे खाल्ल्यानंतर प्रियांका गांधी यांनी डोसे बनवण्याची कला शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची ही इच्छाही पूर्ण झाली.
प्रियांका गांधी यांची इच्छा ऐकून रेस्टॉरंटच्या मालकाला खूप आनंद झाला आणि त्याने लगेच होकार दिला. तो त्यांना आपल्यासोबत किचनमध्ये घेऊन गेला. तिथे प्रियांका गांधी यांनी स्वतः डोसा बनवला. त्याठिकाणी उपस्थित असलेले लोक प्रियांका गांधींना म्हणाले "मॅडम, एक और बनाइए". त्याच्या उत्तरात प्रियंका गांधी हसल्या आणि म्हणाल्या- "तुम भी खाओगे". दरम्यान, प्रियांका गांधी यांनी तव्यावर जवळपास 6 डोसे तयार केले. परंतु ते वेळीच पलटवू न शकल्याने त्यातील किमान दोन भाजले. या घटनेने हशा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलांशी संवादही साधला. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी रेस्टॉरंट मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला.
मंगळवारी म्हैसूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, "पंतप्रधान इथे आले आणि म्हणाले की विरोधी पक्षाच्या नेता त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत. त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे? देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधानांचे चांगले आरोग्य हवे आहे.'' तसेच, त्या म्हणाल्या, "कर्नाटकच्या जनतेने त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान केले पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून नाही," त्या म्हणाल्या, भाजपने राज्यात कोणतेही विकास काम केले नसल्याने कर्नाटकात परिवर्तनाची वेळ आली आहे. दरम्यान, कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात 10 मे रोजी होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.