लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकाविरोधात काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी जोरदार मोहिम उघडली आहे. मात्र, एका ट्विटवरून त्या तोंडघशी पडल्या आहेत.
उन्नावच्या ट्रान्सगंगा सिटीमध्ये एका आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीमारामुळे शेतकरी निपचित पडला होता. या बाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याचा फोटो गांधी यांनी ट्विट करत टीका केली होती. मात्र, थोड्य़ाच वेळात एका युजरने तो पूर्ण व्हिडीओ टाकल्याने गांधी यांच्यावर ते ट्विट डिलीट करायची वेळ आली.
ट्रान्सगंगा सिटीमध्ये सरकारी अधिकारी जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी आले होते. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याने एक शेतकरी जमिनीवर पडला होता. रविवारी हा प्रकार झाला होता. यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरणही तापले होते. प्रियंका गांधी यांनी या घटनेचा व्हिडिओच सरकारविरोधात वापरला. मात्र, त्यांच्याकडे पूर्ण व्हिडीओ आला नव्हता.
प्रियांका यांनी यावर मुख्यमंत्री आताच गोरखपूरमध्ये शेतकऱ्यांबाबत मोठे मोठे भाषण देत आहेत. तर उन्नाव मध्ये त्यांचेच पोलिस शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करत आहेत. एक शेतकरी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. त्याला आणखी मारले जात आहे, असे ट्विट केले. यावर उन्नाव पोलिसांनीच तो व्हिडिओ पोस्ट करत उत्तर दिले आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण शेतकरी पोलिसांच्या लाठ्या वाचविण्यासाठीच असा पडला होता. पोलिस पुढे जाताच त्याने उठत धूम ठोकल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रियंका गांधींना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. हे कळताच गांधी यांना हे ट्विट डिलिट करावे लागले.