लखनऊ - महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. देशातील दोन्ही प्रमुख पक्ष असलेले भाजपा व काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. बंडखोरीची लक्षणे दिसलेल्यांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीउत्तर प्रदेश काँग्रेसचे काही नेते पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत असल्याने नाराज आहेत. यामुळेच प्रियंका गांधी लखनऊमध्ये घर शोधत असल्याची माहिती मिळत आहे.
2022 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रणनिती आखण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी लखनऊमध्ये राहून प्रियंका अधिकाधिक वेळ घालवू इच्छित असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी लखनऊमध्ये घर शोधत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांच्या घराची शोधमोहिम लखनऊमध्ये जोरदार सुरू आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचं लखनऊमध्ये गोखले मार्गावर एक घर आहे. 2 ऑक्टोबरला जेव्हा प्रियंका लखनऊमध्ये गेल्या होत्या तेव्हा विमानतळावरून थेट गोखले मार्गावर गेल्या होत्या. याचाही विचार होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्रियंका गांधी किंवा गांधी परिवारातील दुसरे सदस्य सर्वसाधारणपणे रायबरेलीत उतरतात. पण पक्ष नेत्यांचे म्हणणे असे आहे की लखनऊमध्ये घर असल्याने प्रियंका आणि पक्ष अशी दोघांची सोय होईल. पक्ष दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याऐवजी नव्या चेहऱ्यांना राजकारणात आणण्यावर लक्ष केंद्रित करेल असे निर्देश प्रियंका यांनी दिले आहेत. तसेच पक्षाच्या विचारांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रियंका गांधी यांनी दिले आहेत.
भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची रविवारी प्रियंका गांधी यांनी गळाभेट घेतली. या भेटीचे छायाचित्र प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर शेअर केले असून त्याला असंख्य नेटकऱ्यांनी मनापासून दाद दिली. प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, प्रदीर्घ काळानंतर शेख हसीना यांच्याशी भेट झाली. आपल्या ध्येयासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. त्यात वैयक्तिक नुकसानही झाले; पण त्यांनी हार मानली नाही. त्यांची हीच धडाडी माझ्यासाठी प्रेरणास्रोत ठरली आहे.