लखनऊ : देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. पक्षाच्या स्थापनादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात काँग्रेसकडून आज देशभर विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे.
काँग्रेसच्यावतीने ठिकठिकाणी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' अशी घोषणा देत 'फ्लॅग मार्च'काढण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. तसेच, नाव न घेता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या विरोधी पक्षांवरही निशाणा साधला.
उत्तर प्रदेशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून इतर विरोधी पक्ष काहीच करत नाहीत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्यालाच सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लढावे लागणार आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.
प्रियंका गांधी म्हणाले, "आज देश संकटात आहे. आम्ही विविध राज्यात हिंसाचार झाल्याचे पाहिले. विद्यार्थी आणि तरूण आपला आवाज उठवत आहेत. मात्र, सरकार त्यांची गम्मत करत आहे. भीतीचे वातावरण तयार करत आहे. तरूणांना मारले जात आहे. आज आम्ही एका विचारधारेसोबत लढत आहोत. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यांत काहीच भूमिका नव्हती."
दरम्यान, दिल्लीसह देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी देशभरात मोर्चे काढायचे ठरविले. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत.