'एका महिन्यात बंगला खाली करा', प्रियंका गांधींना मोदी सरकारकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 07:31 PM2020-07-01T19:31:34+5:302020-07-01T20:03:59+5:30
प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे.
इस्टेटच्या उपसंचालकांकडून प्रियांका गांधी यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशीत असे म्हटले आहे की, ठरलेल्या कालावधीनंतरही बंगल्यात राहिल्यास भाडे / दंड भरावा लागेल. तसेच, यामध्ये प्रियांका गांधी यांना बंगला खाली करण्याचे कारण त्यांची एसपीजी सुरक्षा हटविण्यात आल्याचे देण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांना एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.
याचबरोबर, गृह मंत्रालयाकडून एसपीजी संरक्षण हटविल्यानंतर तुम्हाला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. ज्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी बंगल्यांचे वाटप /रिटेंशनची तरतूद नाही, म्हणून लोधी इस्टेटच्या घर क्रमांक 35 चे अलॉटमेंट रद्द करण्यात येत आहे, असे प्रियंका गांधींना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली. त्यानंतर त्यांना केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांना बंगला खाली करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेससह विरोधी पक्ष विरोध दर्शविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आणखी बातम्या...
ड्रॅगनला नरेंद्र मोदींचा दणका, Weibo वरून एक्झिट घेण्याचा निर्णय
तीन वर्षांच्या मुलाला वाचवणाऱ्या जवानाचं होतंय कौतुक, पण ओमर अब्दुल्लांकडून प्रश्नचिन्ह!
चीनला आणखी एक धक्का; BSNL-MTNL कडून 4G टेंडर रद्द!
'त्या' एका घटनेमुळं बदललं आयुष्य अन् बनली आयपीएस अधिकारी!