नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मंगळवारी (12 मार्च) कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेऊन काँग्रेसनेलोकसभा निवडणुकांचे जोरदार रणशिंग फुंकले. या कार्यकारिणीमध्ये भाजपा, रा.स्व. संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे जाहीर सभेतील भाषण हे जनतेसाठी आकर्षण होते. काँग्रेसच्या गुजरातमधील जाहीर सभेला बऱ्याच वर्षांनी इतकी प्रचंड गर्दी झाली होती. गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे.
प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी 2019 मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे. मात्र मंगळवारी त्यांनी पहिलं ट्वीट केलं. ट्वीटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो पोस्ट केला आहे. तसेच साबरमतीच्या साध्या प्रतिष्ठेत सत्यतेचं वास्तव्य आहे असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पाच मिनिटांनंतर प्रियंका गांधी यांनी दुसरं ट्वीट केलं. महात्मा गांधी यांनी दिलेला अहिंसेचा संदेश त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये दिला आहे.
प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीसपद स्वीकारून राजकारणात औपचारिकरीत्या सक्रिय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौ येथील रोड शो पूर्वी प्रियंका गांधी यांचे सोशल मीडियावरील प्रभावी अस्र असलेल्या ट्विटरवरही आगमन झाले. प्रियंका गांधी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरू झाल्यानंतर त्यांना फॉलो करण्यासाठी फॉलोअर्सची झुंबड उडाली होती. प्रियंका गांधी वाड्रा या नावाने प्रियंका गांधी यांचे ट्विटरवरी अधिकृत अकाऊंट सुरू झाले. त्यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली होती.
काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी आणि भाजपाने भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी. असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला. तसेच मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारावेत, असे आवाहनही केले.
प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारने दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे व प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पाळले नसल्याची आठवण करून दिली. मोदी यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत आणि द्वेषाच्या राजकारणातून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, महत्त्वाच्या संस्था, यंत्रणा यांना कमकुवत करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याचा जाब जनतेने त्यांना विचारावा.
महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातूनच स्वातंत्र्याची चळवळ उभारली होती, याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, आताही आपल्याला पुन्हा स्वातंत्र्यासाठीच लढावे लागणार आहे. गांधीजींनी दिलेल्या स्वातंत्र्यानंतर ‘मत’ नावाचे शस्त्र आपल्या हाती आले आहे. तुमचे एक मत हे मोठे शस्त्र आहे. कोणालाही न दुखावता, शारीरिक नुकसान न करता आश्वासने पूर्ण न करणाऱ्या मोदी सरकारला या शस्त्राने त्यांची जागा दाखवून द्या.