अहमदाबाद - काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी आणि भाजपाने भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी. असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला. तसेच मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारावेत, असे आवाहनही केले. गांधीनगर येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक झाली. त्यानंतर आयोजित जनसभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठमोठी आश्वासने देतात. मात्र त्यांना दोन कोटी रोजगार कुठे गेला. महिला सुरक्षेचे काय झाले, याचा प्रश्न मोदींना विचारला पाहिजे. प्रेम, समता, बंधुता यांच्या पायावर हा देश उभा आहे. मात्र आज या देशात जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे. तुमची जागरुकताच या देशाला घडवणार आहे. स्वातंत्र्याची लढाई याच ठिकाणाहून सुरू झाली होती. आता तिथूनच या सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरू झाली पाहिजे, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी यावेळी केले.
देशातील घटनात्मक संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. मने दुभंगलेली आहेत. त्यामुळे देशाचे रक्षण करण्यासाठी एजुटीने काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आली आहे, असेही त्यांनी सांगितले.