Robert Vadra On Politics : "जनतेची इच्छा असल्यास सक्रिय राजकारणात उतरणार," EVM वरही रॉबर्ट वाड्रांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 08:22 PM2022-04-11T20:22:54+5:302022-04-11T20:23:49+5:30
Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राजकारणात उतरुन मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू शकतो, असं वक्तव्य केलं.
Robert Vadra On Politics : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Congress Priyanka Gandhi-Vadra) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (रॉबर्ट वाड्रा) यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात (Politics) उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा असल्यास आपण राजकारणात उतरू शकतो. राजकारणात उतरून आपण मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करू इच्छितो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. वाड्रा हे रविवारी मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. दरम्यान त्यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि अन्य मदिरांमध्ये पूजाही केली.
"मला राजकारणाची माहिती आहे. सामान्य जनतेला जर मी त्यांचं नेतृत्व करावं असं वाटतं असेल आणि मी त्यांच्यासाठी काही बदल घडवू शकतो असं वाटत असेल, तर मी हे पाऊल नक्कीच उचलेन," असं वाड्रा म्हणाले. "मी १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून समाजकार्यात आहे आणि हे पुढेही कायम राहील. कितीही वेळ लागला किंवा मी राजकारणात येईन अथवा नाही मी जनतेची सेवा करतच राहणार," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
"... तर मोठ्या प्रमाणात सेवा करता येईल"
जर आपण राजकारणात आलो तर लोकांची मोठ्या प्रमाणात सेवा करत येईल. तसं आताही मी देशभरात मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पोहोचतोय. लोक माझ्यासोबत आहेत याची मला कल्पना आहे. त्यांना माहितीये जर माझ्या नावाचा वापर केला, तर जनतेसाठी चांगलंच काम करणार असंही ते म्हणाले.
"सद्यस्थिती पाहून भिती वाटते"
"पुढे काय होतं हे पाहू. आम्ही दररोज कुटुंबात आजकाल कशाप्रकारचं राजकारण केलं जात आहे आणि देश कसा बदलतोय याची चर्चा करतो," असं वाड्रा म्हणाले. तसंच राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सद्यस्थिती पाहून भिती वाटते असंही ते म्हणाले. "आजकाल माध्यमांना खरी परिस्थिती दाखवायला भिती वाटते. हे सर्व लोकशाहीचा भाग नाही. या गोष्टी देशाला पुढे नेणाऱ्या नाही, त्या देशाला मागे घेऊन जातील," असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी प्रियंका गांधींच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीवर बोलताना त्यांनी आपण त्यांना १० पैकी १० गुण देणार असल्याचं सांगितलं. त्यांनी दिवसरात्र एक करून काम केलं. आम्ही उत्तर प्रदेशचा जनादेश स्वीकार असल्याचं म्हणत लोकांच्या हितासाठी पूर्ण मेहनतीनं काम करत राहणार असल्याचं सांगितलं.
ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह
"ईव्हीएमच्या बाबतीस सामान्यांच्या मनात जी शंका आहे ती जर दूर केली तर देशात राजकीय निकाल वेगळे दिसतील," असंही वाड्रा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कोरोना काळात देशात अचानक लॉकडाऊन लावण्यात आला. सध्या बेरोजगारीही वाढत आहे. देशातील हिंदू मुस्लीम भेदभाव संपला पाहिजे आणि सर्वांच्या मतांचा समानतेनं आदर करत ते स्वीकारले पाहिजे असंही ते म्हणाले.