आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यांवर काँग्रेसने शुक्रवारी तीव्र आंदोलन केले. त्यात सहभागी झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सरचिटणीस प्रियांका गांधी यांना महिला पोलिसांनी अक्षरश: ओढत, फरपटत ताब्यात घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात महिला पोलीस प्रियांका यांना जबरदस्तीने वाहनात बसविताना, धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. संसद सदस्यांचा मोर्चा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही यात थोड्या वेळासाठी सहभागी झाल्या होत्या.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सदस्यांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनपर्यंत मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना मध्येच रोखून ताब्यात घेतले. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे ठरविले होते. प्रियांका गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींसाठी मात्र महागाई नाही. त्यांनी काही लोकांना देशाची संपत्ती दिली आहे. राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई यांच्यासह ६४ संसद सदस्यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईचा व्हिडीओ व्हायरल; कार्यकर्त्यांमध्ये संतापn नंतर त्या रस्त्यावर धरणे आंदोलनास बसल्या. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, ते शक्य झाले नाही. त्यानंतर प्रियांका गांधी यांना महिला पोलिसांनी अक्षरश: ओढत, फरफटत ताब्यात घेतले. n अन्य एका व्हिडीओत महिला पोलीस त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविताना, धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
प्रियांका गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सकाळी गॅस सिलिंडरसह काँग्रेस मुख्यालयातून बाहेर निघाले तेव्हा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. काळ्या रंगाची सलवार-कमीज आणि दुपट्टा परिधान केलेल्या प्रियांका गांधी यांनी पक्ष मुख्यालयासमोर पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्सवरून उडी मारली. त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना घेरले.
हे हुकूमशाही सरकार घाबरलेले आहे. भारताच्या परिस्थितीची, महागाईची आणि ऐतिहासिक बेरोजगारीची त्यांना भीती वाटत आहे. ते वास्तवाला घाबरतात, आवाज उठविणाऱ्याला धमकावतात. - राहुल गांधी
पोलिसांना वाटते की, ते विरोधकांना दाबू शकतात. आम्ही दबावात येऊन बसमध्ये बसू; पण आम्ही असे का करावे? यांचे मंत्री म्हणतात की, महागाई दिसत नाही. आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन महागाई दाखवू इच्छितो. - प्रियांका गांधी