लखनऊ : उत्तर प्रदेशमधील २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करायचे, याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी घेणार आहेत, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणकोणते मुद्दे असावेत, याची पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी खुर्शीदमेरठमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, विद्यमान राज्य सरकारच्या धोरणांविरोधात प्रियांका गांधी नेहमीच टीका करतात. आता ही टीका अधिक धारदार होईल. ते म्हणाले की, भारतात शिक्षण घेत असलेल्या अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने पावले टाकली पाहिजेत.
शेतकरी, महिला, युवक त्रस्तकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे शेकडो लोकांनी जीव गमावले. उत्तर प्रदेशात महिलांचा सन्मान राखण्यात येत नाही. शेतकरी, युवक त्रस्त आहेत. या राज्यात आजवर १० टक्के लोकांचेही लसीकरण झालेले नाही.