- आदेश रावलनवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाडमधून विजयी झाले होते. नियमांनुसार त्यांना एक जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खासदार म्हणून कार्यरत राहणार असून, वायनाडची जागा ते रिक्त करणार आहे. वायनाडच्या जागेवरून प्रियांका गांधी यांना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
वायनाडच्या जागेवर यापूर्वी स्थानिक नेत्यांला उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, ही जागा गांधी परिवाराकडेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठीतून लोकसभा लढविली होती. अमेठीत त्यांचा पराभव झाला, तर वायनाडमध्ये ते जिंकले होते. कठीण काळात वायनाडच्या जनतेने गांधी कुटुंबातील व्यक्तीला खासदार म्हणून निवडले होते. त्यामुळे या जागेवर गांधी कुटुंबीयातील व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय झाला आहे.