प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला उभारी, पण घेता येईल का भरारी?
By बाळकृष्ण परब | Published: January 24, 2019 03:15 PM2019-01-24T15:15:15+5:302019-01-24T16:04:24+5:30
प्रियंका गांधींच्या सक्रियतेमुळे उत्तर प्रदेशात व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत मोदींचे आव्हान मोडीत काढून त्या पक्षाला चमत्कारिक विजय मिळवून देतील, अशी काँग्रेसच्या समर्थकांना अपेक्षा आहे. पण खरोखरच असे होईल का?
- बाळकृष्ण परब
अगदी काही दिवसांवर आलेली लोकसभेची निवडणूक, समोर असलेले मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे तगडे आव्हान, प्रादेशिक पक्षांकडून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला मिळत नसलेला तितकासा सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अखेर आपला हुकूमाचा पत्ता असलेल्या प्रियंका गांधी यांना राजकारणाच्या रणात उतरवण्याची खेळी खेळली आहे. थेट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करताना प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. काँग्रेसच्या या प्रियंकास्रामुळे उत्तर प्रदेशात व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत मोदींचे आव्हान मोडीत काढून त्या पक्षाला चमत्कारिक विजय मिळवून देतील, अशी काँग्रेसच्या समर्थकांना अपेक्षा आहे. पण खरोखरच असे होईल का?
प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रियंका गांधी यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हावे अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. काही वर्षांपूर्वी तर 'मैया रहती है बिमार, भैया पर बढ गया है भार, प्रियंका फुलपूरसे बनो उम्मिदवार' अशी मागणी करणारे बॅनरही उत्तर प्रदेशात झळकले होते. पण प्रियंकांनी स्वतःला अमेठी, रायबरेली येथील प्रचारापुरते मर्यादित ठेवले होते. मात्र प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या तर पक्षाला गतवैभव मिळेल, अशी आशा काँग्रेस कार्यकर्ते बाळगून होते. त्यामुळेच काल प्रियंका यांच्याकडे महत्त्वाची जाबबदारी सोपवण्याची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशसह देशभरातील कार्यकर्त्यांनी त्याचे उत्साहात स्वागत केले.
प्रियांका गांधींचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी त्या उत्तर प्रदेशात काही मोठा चमत्कार घडवून आणतील अशी अपेक्षा बाळगणे जरा घाईचे ठरेल. त्याचे मुख्य कारण म्हणजे नरेंद्र मोदींचा करिष्मा काहीसा कमी झालेला असला तरी त्यांचा प्रभाव कायम आहे तसेच उत्तर प्रदेशात भाजपाचे संघटन हे काँग्रेसपेक्षा कैकपटीने भक्कम आहे. तर काँग्रेसला प्रियंका गांधींच्या रूपात शक्तिशाली सेनानी लाभला असला तरी त्यांच्याकडे लढण्याइतपतही सैन्य नाही. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे लढण्यासाठी उमेदवार आणि प्रचारासाठी कार्यकर्तेही नाहीत, अशी परिस्थिती आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशात सपा-बसपा महाआघाडीत आपल्याला स्थान मिळेल, अशी आशा काँग्रेस नेतृत्वाला होती.(ती त्यांनी अजूनही सोडलेली नाही) पण अखिलेश आणि मायावती यांनी ऐनवेळी ठेंगा दाखवल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. सपा- बसपाच्या महाआघाडीमुळे भाजपा अडचणीत आला आहे ही बाब काँग्रेसला दिलासा देणारी आहे. मात्र या आघाडीकडे जाणारा दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचाही पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे या आघाडीचा भाजपापेक्षा कैकपटीने अधिक फटका काँग्रेसच्या व्होटबँकेला बसणार आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशात किमान समाधानकारक जागा मिळवायच्या असतील तर प्रियंका गांधींना महाआघाडीकडे वळणारा मतदार मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे वळवण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल.
प्रियंका गांधी यांची चेहरेपट्टी आणि व्यक्तिमत्त्वाची ठेवण ही आजी इंदिरा गांधी यांच्याशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे 'प्रियंका नही आंधी है, दुसरी इंदिरा गांधी है', अशा घोषणा दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तर प्रियंका गांधी या 21 व्या शकतकातील इंदिरा गांधी असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदारही प्रियंकांकडे इंदिरा गांधींचे प्रतिरूप म्हणूनच पाहतील आणि त्यांचे आवाहन ऐकून पक्षाला भरभरून मते देतील, अशी अपेक्षा काँग्रेसजनांना आहे. मात्र इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या काळात कमालीचा फरक आहे. आज केवळ घराण्याची पुण्याई आणि चेहरा पाहून मतदार मत देत नाहीत. त्यामुळे प्रियंका गांधी केवळ इंदिरा गांधींसारख्या दिसतात म्हणून मतदार काँग्रेसला मतदान करेल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल.
परंतु, सद्यस्थितीत उत्तर प्रदेशात गलितगात्र झालेल्या आणि कुठल्याही मित्रपक्षाचा आधार न उरलेल्या काँग्रेसच्या शरीरात प्रियंकांच्या आगमनामुळे काही प्रमाणात त्राण नक्कीच आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक जोमाने लढण्यास प्रोत्साहित करेल. तसे झाले तर उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी 2014 पेक्षा नक्कीच सुधारलेली असेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.