रायबरेली - राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवल्यानंतर सोनिया गांधी यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांच्यानंतर काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद राहुल गांधी सांभाळणार आहेत. दुसकीकडे सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीची कमान प्रियांका गांधींकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे 2019 ची निवडणूक प्रियांका गांधी रायबरेलीतून लढतील असं म्हटलं जात आहे. इंदिरा गांधींचे गुरु आणि गांधी घराण्याच्या जवळचे असलेले दिवंगत गया प्रसाद यांनीदेखील प्रियांका गांधींनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं.
राहुल गांधींमुळेच प्रियांका गांधी राजकारणात उतरत नसल्याचं आतापर्यंत म्हटलं गेलं आहे. आपण राजकारणात आल्यास तुलना होण्यास सुरुवात होईल अशी भीती त्यांना वाटत असल्याचं म्हटलं जातं. पण सध्या प्रियांका गांधी राजकारणात प्रवेश करत रायबरेलीतून निवडणूक लढतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
गया प्रसाद यांचं 2010 मध्ये निधन झालं. काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींचा राज्याभिषेक होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबात आनंदोत्सव साजरा झाला होता. गया प्रसाद यांचे पूत्र जगदीश शुक्ला आपल्या वडिलांच्या विचारांवर काही बोलत नाहीत, मात्र राहुल गांधींनी अध्यक्षपदाची धूरा सांभाळल्याने ते आनंदित आहेत.
'माझे वडिल नेहमी सांगायचे की, राहुल गांधी एकदम शांत आणि रिझर्व्ह आहेत, त्यांना प्रियांका गांधींच्या सहकार्याची गरज आहे. त्यांना प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व दिसायचं. प्रियांका गांधी स्पष्ट बोलतात आणि राजकारणात बहिण भावाची ही जोडी खूप चांगलं काम करु शकते. प्रियांका गांधी 2019 ची निवडणूक लढतील अशी आम्हाला आशा आहे', असं जगदीश शुक्ला म्हणाले आहेत.
रायबरेतील या कुटुंबाच्या घरी गणपतीचा एक 40 वर्षीय जुना फोटो आहे. जेव्हा कधी नेहरु-गांधी कुटुंबातील एखादा सदस्य उमेदावारी अर्ज भरतो किंवा एखादा पदभार स्विकारतो तेव्हा गणपतीची आरती आणि हवन केलं जातं. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा सुरु आहे.
यावेळी त्यांनी राहुल गांधींची सोमनाथ मंदिरातील नोंदवहीत अहिंदू म्हणून नोंद केल्यामुळे झालेल्या वादावरही भाष्य केलं. 'तुम्ही आमच्या घरात लागलेले फोटो पाहू शकता. त्यांनी सर्व पूजा, कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. रायबरेलीत आल्यानंतर ते नेहमी मंदिरांना भेट द्यायचे. त्यांच्या हिंदू असण्याचे अजून पुरावे द्यायचं काम आहे का ?', असा प्रश्न त्यांनी विचारला.