आदेश रावलवायनाड/नवी दिल्ली : केरळमधील वायनाडलोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आपले निकटचे प्रतिस्पर्धी व माकपप्रणित एलडीएफ आघाडीचे उमेदवार सत्येन मोकेरी यांच्यावर ४.१ लाख मताधिक्याने विजय मिळविला आहे. सक्रिय राजकारणात गेली अनेक वर्षे असलेल्या प्रियांका गांधी आयुष्यात पहिल्यांदाच लढविलेली निवडणूक जिंकली आहे.
प्रियांका गांधी यांना एकूण ६,२२,३३८ मते मिळाली. यंदाच्या वर्षी वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकांत राहुल गांधी यांना मिळालेल्या ६,४७,४४५ मतांपेक्षा ही संख्या कमी आहे. मात्र राहुल गांधी यांनी त्यावेळी निकटच्या प्रतिस्पर्ध्यावर ३,६४,४३३ इतके मताधिक्य मिळविले होते. तर, प्रियांका गांधी यांना त्यापेक्षा अधिक ४,१०,९३१ मताधिक्य या पोटनिवडणुकीत मिळाले आहे. वायनाड पोटनिवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले होते. प्रियांका गांधी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यन मोकेरी यांना २,११,४०७ तर एनडीएच्या उमेदवार नाव्या हरिदास यांना १,०९,९३९ इतकी मते मिळाली.
वायनाडमधील पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याने आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी व बहीण प्रियांका गांधी हे भाऊ-बहीण लोकसभेमध्ये हिरिरिने कामकाजात भाग घेतानाचे चित्र भावी काळात दिसणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी रायबरेली व वायनाड या दोन मतदारसंघांतून लढत दिली होती. त्या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी रायबरेली मतदारसंघ आपल्याकडे ठेवून वायनाड मतदारसंघ सोडला. या निर्णयामुळे वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली.
राहुल यांच्या विजयाची प्रियांकांनी राखली परंपरा
यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत वायनाडमध्ये राहुल गांधी यांना ६.४७,४४५ मते मिळाली होती. त्यांनी आपले निकटच्या प्रतिस्पर्धी सीपीआयच्या ॲनी राजा यांचा ३६४४२२ मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१९ साली राहुल गांधी यांना ७०६३६७ मते मिळाली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ४३१७७० मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०२४ मध्ये वायनाड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी जितक्या मतांच्या फरकाने निवडून आले होते, त्या फरकाचा आकडा प्रियांका गांधी यांनी पोटनिवडणुकीत पार केला हे या निकालाचे वैशिष्ट्य आहे.
वायनाडच्या मतदारांचा आवाज बनणार : प्रियांका
वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजयी केल्याबद्दल मी तेथील लोकांची आभारी आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले. मी वायनाडच्या मतदारांचा संसदेतील आवाज बनेल. त्यांच्या समस्यांना वाचा फोडणार आहे, असे सांगत प्रियांका यांनी विजया बद्दल कुटुंबीयांचे आभार मानले.