- अपर्णा वेलणकरडिग्गी पॅलेस, जयपूर : प्रियंका गांधी यांची सरचिटणीस म्हणून नेमणूक राहुल गांधी यांच्या सहीने झाली आहे. त्यामुळे प्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत, असे सुनावत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसमधील प्रियंकांचा सक्रिय सहभाग येत्या तीन महिन्यांत सर्वात मोठा ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी खात्री व्यक्त केली.‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या उद्घाटनाच्या दिवशी ते बोलत होते. मतदारांचा चेहरा, त्यांच्या अपेक्षा आणि आक्षेप हे आता बदलले आहे. घराणेशाहीचे आरोप, राष्ट्रवादाचा उद्धट चेहरा व कंठाळी चर्चांच्या पलीकडे जाऊन वर्तमानासाठी निवड करण्याचे नवे निकष मतदारांनी तयार केले आहेत.प्रियंकांच्या प्रवेशामुळे सपा-बसपाला फटका बसून भाजपाच्या विरोधातील मते फुटतील, हे गृहीतक पायलट यांनी फेटाळले. त्यांनी माध्यमांनाही सुनावले. देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत, पण माध्यमे मात्र कोणी जानवे घातले, गोत्र कोणते, कोण मंदिरात वा मशिदीत गेले, असल्या फुटकळ चर्चा लढवण्यात गर्क आहेत. यात वेळ फुकट चालला आहे.योगी आदित्यनाथ आणि प्रियंका या दोघांंत निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही, असेही पायलट यांनी स्पष्ट केले.>प्रियंकांना का नाकारता?कोणत्या कुटुंबात जन्माला आले या निकषावरून त्या व्यक्तीला संधी देणे जर चूक असेल, तर त्याच निकषावर संधी नाकारणेही चूक आहे. प्रियंका गांधी प्रथमच एवढी मोठी जबाबदारी सांभाळत आहेत, त्यांच्या कर्तृत्वाला अवकाश मिळणे ही घराणेशाही कशी? तो त्यांचा हक्कच आहे. - सचिन पायलट
"प्रियंका गांधींचा सक्रिय सहभाग हा गेमचेंजर ठरेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 5:43 AM