शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सरकारी बंगला सोडून खासगी निवासस्थानी जाणार आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी दिलेल्या नोटीसमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
विशेष रक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्यात आल्याच्या आधारे त्यांना सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. १ ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला सोडावा, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून घेतले होते. १९९७ मध्ये एसजीपी संरक्षणामुळे त्यांना ३५ लोधी एस्टेट स्थित सरकारी बंगला देण्यात आला होता.
काँग्रेसने या नोटीसवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु सूत्रांनुसार नोटीस मिळण्याच्या आधीपासून सरकारी बंगला सोडण्याचा त्या विचार करीत होत्या. त्या दिल्ली, गुरुग्राममध्ये खाजगी बंगल्यात राहतील किंवा मेहरोली येथील फार्म हाऊसमध्येही जाण्याची शक्यता आहे, असेही संकेत आहेत. तथापि, लखनौतच राहण्याचा त्यांचा इरादा असून, त्यांनी तेथे घरही घेतले आहे.