प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 04:26 AM2019-01-28T04:26:23+5:302019-01-28T04:27:06+5:30
बसपाचे मौन; समाजवादी पक्षाने मात्र केले स्वागत
लखनौ: प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या हा चांगला निर्णय आहे असे समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन केले आहे.
प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल सपाचा मित्रपक्ष बहुजन समाज पार्टी (बसपा) व त्याच्या प्रमुख मायावती यांनी अजून काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, राजकारणात जितके नवे लोक येतील, त्याचा समाजवादी पक्षाला आनंदच होईल.
प्रियंका गांधी यांना कॉँग्रेसचे सरचिटणीसपद देऊ न, त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘मायावती व अखिलेश यादव यांचा मी आदर करतो’, असे विधान केले होते. सपा व बसपाला धक्का देणे हा आमचा हेतू नसून, भाजपाला पराभूत करणे, हे दोघांचेही उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसशी आघाडी करणार का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे मात्र अखिलेश यादव यांनी टाळले.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकांत कर्नाटकामध्ये प्रचारासाठी प्रियंका गांधींनी यावे यासाठी राज्यातील काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. तशी विनंती ते राहुल यांना करणार आहेत. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांच्या व्यक्तिमत्वात त्यांची आजी इंदिरा गांधींचा भास होतो. कर्नाटकातील जनतेने कायमच काँग्रेसला साथ दिली आहे. प्रियंकांनी प्रचार केला तर कर्नाटकामध्ये पक्षाला खूप फायदा होईल असे काँग्रेस नेत्यांना वाटते. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी कर्नाटकातून निवडणूक लढविली होती.
कुंभमेळ्यात करणार स्नान
उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ््यात मौनी अमावास्येला ४ फेब्रुवारी रोजी गंगा नदीत पवित्र स्नान करून प्रियंका गांधी आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करण्याची शक्यता आहे. त्यादिवशी शक्य न झाल्यास १० फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला शाही स्नानाचा मुहूर्त गाठला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. राहुल व प्रियंका गांधी हे दोघेही पवित्र स्नान करतील. २००१ साली सोनिया गांधी यांनीही कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केले होते.