प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 07:22 AM2019-02-07T07:22:36+5:302019-02-07T07:25:59+5:30
प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज
लखनऊ: प्रियंका गांधींच्या राजकारणातील एन्ट्रीचा फायदा उत्तर प्रदेशातकाँग्रेसला होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. प्रियंका गांधींकडेउत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका राजकारणात सक्रीय झाल्यानं काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असा अंदाज इंडिया टीव्ही-सीएनएक्सनं यांच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मात्र यामुळे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या महाआघाडीला बसणार आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधींची सक्रीय राजकारणातील एन्ट्री भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे.
प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लोकसभेच्या 43 जागा आहेत. यातील जवळपास सर्वच जागांवर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. याचा फटका महाआघाडीला बसू शकेल. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील 43 पैकी 19 जागांवर महाआघाडीला, 20 जागांवर भाजपाला यश मिळेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागू शकतं.
आधीचा अंदाज काय?
प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात पूर्वांचलमध्ये (उत्तर प्रदेशचा पूर्व भाग) काँग्रेसला रायबरेली आणि अमेठी या दोनच जागांवर यश मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सपा-बसपाच्या महाआघाडीला 26 आणि भाजपाला 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
प्रियंका गांधींच्या एन्ट्रीमुळे कोणाचा किती फायदा? किती नुकसान?
प्रियंका गांधी सक्रीय झाल्यानं काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. आधी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज होता. प्रियंका गांधींमुळे त्यात फक्त दोननं वाढ होईल. काँग्रेसची मतं वाढल्याचा मोठा फटका महाआघाडीला बसू शकतो. त्यांना आधी 26 जागा मिळण्याचा अंदाज होता. त्या आता 19 वर येऊ शकतात. म्हणजेच 7 जागांचं नुकसान होऊ शकतं. काँग्रेसची मतं वाढल्यानं भाजपाच्या मतांवरही परिणाम होईल. मात्र महाआघाडीला सर्वाधिक फटका बसल्यानं भाजपाचा फायदा होऊ शकतो. त्यांना आधी 15 जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र आता त्यांना 20 जागा मिळू शकतात. म्हणजेच 5 जागांचा फायदा होऊ शकतो.