सिमला : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी-वड्रा यांचे सिमल्यातील घर वादाच्या भोवऱ्यात सापडले असून राष्ट्रपतींच्या उन्हाळी निवासस्थानाच्या (प्रेसिडेन्शियल समर रिट्रिट) अगदी जवळ बांधण्यात येत असलेले हे घर राष्ट्रपतींसह इतरही व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेस संभाव्य धोका ठरू शकणार असल्याने प्रियांका गांधी यांना हे घर बांधण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली जावी, अशी मागणी एका भाजपा नेत्याने केली आहे.भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी राज्यसभा सदस्य व विद्यमान आमदार सुरेश भारव्दाज यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून प्रियांका गांधी यांच्या घराचा विषय उपस्थित केला असून प्रियांका गांधी यांना त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा फायदा देऊन राष्ट्रपतींच्या सुरक्षेशी तडजोड केली जाऊ नये, असा आग्रह धरला आहे.सिमला शहराच्या छाबारा भागात घेतलेल्या ४००० चौ. मीटर जमिनीवर प्रियांका गांधी हे घर बांधत आहेत. त्यांचे हे घर राष्ट्रपतींच्या उन्हाळी निवासस्थानाच्या आणि तेथे येण्या-जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लष्ककराच्या ताब्यातील कल्याणी हेलिपॅडच्या अगदी जवळ आहे. राष्ट्रपतींखेरीज पंतप्रधान व अन्य व्हीव्हीआयपी व्यक्तीही राष्ट्रपतींच्या या उन्हाळी निवासस्थानात मुक्कामाला येत असतात. खरे तर राष्ट्रपती निवासस्थानाच्या सभोवतालचा परिसर ‘ना विकास क्षेत्र’ आहे. प्रियांका गांधींनी घर बांधले की जवळपास इतरही घरे उभी राहतील व त्यामुळे माननीय राष्ट्रपतींच्या सुरक्षेस संभाव्य धोका संभवू शतो, असे भारव्दाज यांनी नमूद केले आहे. खरे तर कोणाही बाहेरच्या व्यक्तीला हिमाचल प्रदेशात जमीन खरेदी करण्यास मज्जाव असूनही राज्यात २००३-२००७ या काळात काँग्रेसची सत्ता असताना प्रियांका गांधी यांना ही जमीन खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली, असा आरोप करून भारव्दाज पत्रात म्हणतात की, आधी ही जमीन निवृत्त नौदल अधिकारी कमोडोर देविंदरजीत सिंग यांच्या मालकीची होती. सुरक्षेच्या कारणावरून त्यांना तेथे घर बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली. ते पाहून इतरांनीही त्या भागातील आपापल्या जमीनी पडेल भावाने विकून टाकल्या.भारव्दाज लिहितात की, प्रियांका गांधी जेथे घर बांधत आहेत त्या जमिनीचा खसरा क्र. (सर्व्हे क्र.) २६४-२६९ असा आहे. ही जमीन राष्ट्रपतींच्या उन्हाळी निवासस्थानाच्या जमिनीला अगदी लागून असून दोन्ही जमिनींची हद्द सामायिक आहे. (वृत्तसंस्था)
प्रियांका गांधींच्या सिमल्यातील घराने राष्ट्रपतींची सुरक्षा धोक्यात?
By admin | Published: June 20, 2016 4:35 AM