उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस मजबूत करण्याकडे प्रियांका गांधींचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:34 AM2019-10-23T01:34:55+5:302019-10-23T06:18:49+5:30
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्र, हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेत भाग घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्र, हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेत भाग घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या ही माहिती दिली. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाची उत्तर प्रदेशवरील पकड सैल होत गेली. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी ५० हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकांत संपूर्ण राज्यात काँग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली.
या लोकसभा निवडणुकांत प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, आसाम, हरयाणा, केरळ आदी राज्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या.महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून प्रियांकांबरोबरच त्यांची आई व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी याही लांब राहिल्या.
प्रियंका गांधी रायबरेली मतदारसंघात : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ रायबरेलीला तीन दिवसांच्या भेटीसाठी मंगळवारी रवाना झाल्या. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश शाखेने आयोजित केलेल्या कार्यशाळेतही प्रियंका गांधी सहभागी होणार आहेत.