नवी दिल्ली - चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये अनेक सण साजरे केले जातात. उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, महाराष्ट्र-गोवा याठिकाणी गुढीपाडवा असे विविध सण देशात साजरे होतात. तर जम्मू-काश्मीरमध्ये आजच्या दिवशी नवरेह सण साजरा केला जातो. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काश्मीरच्या लोकांना शुभेच्छा देताना नवरेह ऐवजी नवरोज अशा शब्दाचा उल्लेख केल्याने प्रियंका गांधी सोशल मिडीयावर ट्रोल झाल्या.
नवरोज हा पारशी समुदायाचा सण आहे. त्यामुळे काश्मीरी लोकांना नवरोजच्या शुभेच्छा देण्याची चूक प्रियंका गांधी यांना महागात पडली. प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, माझ्या काश्मिरी बंधू आणि भगिनींना नवरोजच्या शुभेच्छा, काल मला रोड शोमुळे थाळी बनवायला वेळ मिळाला नाही. मात्र जेव्हा मी रोड शो नंतर घरी आले तेव्हा डायनिंग टेबलावर माझी थाळी आधीच लागली होती. आई किती प्रेमळ असते.
दरम्यान प्रियंका गांधी यांच्या ट्विटवर काही काही जणांनी नवरोजच्या शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांना आठवण करुन दिली नवरोज हा पारशी लोकांचा सण आहे, काश्मीरमध्ये नवरेह साजरा केला जातो. तसेच प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी ट्विट करत प्रियंका गांधी यांना सांगितले की, नवरोज हा सण मागील महिन्यात साजरा केला गेला आहे. काश्मीरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी जो सण साजरा केला जातो त्याला नवरेह नावाने ओळखलं जातं.
खूप कमी लोकांना माहीत आहे की, पारसी समुदाय नवीन वर्ष साजरं करतं त्याला नवरोज म्हणतात. यादिवशी पारशी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असतो. नवीन कपडे, मिठाई एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. तर नवरेह सण काश्मीरमधील हिंदू पंडितांचा सण आहे. नवरेह हा सण नवीन वर्ष साजरा करण्यासाठी केला जातो.