नवी दिल्ली : केंद्र सरकारने गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा कमी केली असून त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. यावरून वाद निर्माण झाला असताना प्रियांका गांधी यांच्या घरी घुसखोरी करत सुरक्षा कडे तोडल्याचा आरोप करण्यात आला होता. ही कार काँग्रेसच्याच एका महिला कार्य़कत्याची होती असा खुलासा करण्यात आला आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता यामुळे समोर आली असून सरकारने तीन अधिकाऱ्य़ांना निलंबित केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत सांगितले.
प्रियांका गांधी यांच्या घरी नव्या सुरक्षा व्यवस्थेच्या डोळ्यात धूळ फेकत काही अज्ञात व्यक्ती घुसल्याची तक्रार काल करण्यात आली होती. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यामध्ये पोलिसांची मोठी चूक समोर आली आहे. सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. मात्र, ही कार गेटमधून आतमध्ये येत असताना त्यांच्यापैकी एकाही पोलिसाने थांबविले नाही. यामुळे ही कार थेट घरासमोर नेण्यात आली.
या महिला कार्यकर्त्याने याचा खुलासा केला आहे. तिने एनआयला सांगितले की, मला प्रियांका गांधी यांचे घरही माहिती नव्हते. मी काँग्रेस कार्यालयाला फोन करून माहिती घेतली. गेटमधून जाताना तेथे असलेल्या एकाही पोलिसांनी कारमध्ये कोण बसलेय हे पाहिले नाही. रस्त्यावरील बॅरीकडे हटविण्यात आले आणि लगेचच गेट उघडले गेले. या महिला कार्यकर्त्याचे नाव शारदा त्यागी असे आहे.
या आरोपांनंतर आज राज्यसभेत एसपीजी विधेयक संमत करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी याचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, पोलिसांना ती कार राहुल गांधी यांची वाटली. कारण त्यांना राहुल गांधी येणार असल्याचे सांगण्यता आले होते. ते ही काळ्या रंगाच्या सफारी कारमध्ये बसलेले होते. दोन्ही कारचा रंग सारखाच असल्याने ही चूक झाली. यामुळे पोलिसांनी तपासणी केली नाही. एसपीजी सुरक्षेचा वापर स्टेटस सिम्बॉलसाठी करू नये.