नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच गांधी कुटुंबिय़ांची एसपीजी सुरक्षा काढून घेत नवीन सुरक्षा व्यवस्था केली आहे. यामुळे लोकसभेत वाद निर्माण झाला होता. त्यातच आज गंभीर प्रकरण समोर आले आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या घरात काही अज्ञात व्यक्ती विना परवानगी घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. हटकल्यानंतर या लोकांनी प्रियांका यांच्यासोबत सेल्फी घेण्याची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यावर गृह राज्यमंत्र्यांनी खुलासाही केला आहे.
गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा कमी करून त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली होती. यामुळे या घुसखोरीची तक्रार सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआरपीएफकडे करण्यात आली आहे.
एनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये सुत्रांच्या हवाल्याने प्रियांका यांच्या घरी सुरक्षेचे कडे भेदून काही अज्ञात लोक आत घुसले होते. मुलाखतीची वेळ न घेताच त्यांनी सेल्फी घेण्याची मागणी केली. सीआरपीएफकडे तक्रार केली आहे. तपास सुरू आहे, असे म्हटले आहे. यावर देशाचे गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांना विचारले असता त्यांनी मी लोकसभेत होतो. यामुळे या प्रकरणाची माहिती नाहीय. अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करेन असे उत्तर दिले आहे.