नवी दिल्ली - तरुणांना नोकऱ्या मिळणं किती अवघड आहे हे विविध घटनांवरून समोर येत आहे. अनेक ठिकाणी तरुणाई बेरोजगारीचे चटके सोसत आहेत. अशा परिस्थितीत काही मुले-मुली हार मानतात आणि अस्वस्थ होऊ लागतात. पण असे अनेक तरुण आहेत जे निराश न होता अत्यंत कठीण परिस्थितीतही काहीतरी नवीन करण्याचा विचार करतात आणि त्या दिशेने पाऊल टकतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. प्रियांका गुप्ता असं तरुणीचं नाव असून ती नोकरी मिळत नसल्याने काहीतरी नवीन करत आहे आणि स्वत:सह इतरांनाही प्रेरणा देत आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका गुप्ताने अर्थशास्त्रातून पदवी घेतली आहे. असे असूनही नोकरी न मिळाल्याने तिने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. प्रियांकाने पाटण्यातील महिला महाविद्यालयासमोर तिचा चहाचा स्टॉल सुरू केला आहे. इतकंच नाही तर लोकांना प्रेरणा देण्यासाठी तिनी आपल्या दुकानाच्या बॅनरवर एक उत्तम ओळही लिहिली आहे. तिने लिहून ठेवलंय की, "लोक काय विचार करतील, याचा आपणही विचार केला तर लोक काय विचार करतील..."
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने "मी 2019 मध्ये माझे शिक्षण पूर्ण केले होते, परंतु गेल्या 2 वर्षांपासून मला नोकरी मिळू शकली नाही. प्रफुल्ल बिलोर यांच्याकडून मी प्रेरणा घेतली. अनेक चहावाले आहेत मग चहावाली का असू शकत नाहीत?" असं म्हटलं आहे.
प्रियांकाची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. प्रियांकाच्या अशा विचारसरणीचे लोक भरभरून कौतुक करत आहेत. लोक म्हणतात की, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. काही लोकांनी तिचे अभिनंदन केले आणि सांगितले की इतरांनाही प्रियांकाकडून प्रेरणा मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.