नवी दिल्ली - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून भाजपचा पराभव करण्यासाठी मोहिम आखण्यात येत आहे. त्यासाठी सर्वच विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर अमेठी या मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नाव निश्चित मानले जात आहे. पण, काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून सोनिया की प्रियंका याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे. कारण, काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सोनिया गांधी निवडणुकांच्या मैदानात उतरणार का, हाही प्रश्न आहे. तर आजीच्या मतदारसंघातून आता नात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.
लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी सध्यातरी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही. तर 2019 च्या निवडणुकांनंतरच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यात येईल, अशी माहिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, याबाबत निश्चित उत्तर नाही. मात्र, रायबरेली मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे.
फिरोज गांधीसोबत लग्न केल्यानंतर इंदिरा गांधी अलाहाबाद येथे स्थलांतरीत झाल्या. त्यावेळी 1952 मध्ये सर्वप्रथम फिरोज गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर 1957 मध्येही त्यांनी याच मतदारसंघातून खासदारकीची शपथ घेतली. तर 1967 आणि 1971 मध्ये इंदिरा गांधींनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. तेव्हापासून या मतदारसंघात 1977 आणि 1996 ची निवडणूक वगळता आजपर्यंत काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. तर 2004 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघातून सोनिया गांधींनी विजय मिळवत काँग्रेसची परंपरा जपली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींना आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी, पक्षाची कार्यकर्ता म्हणून मी काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे सोनिया गांधी आगामी निवडणुका लढवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आगामी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण, हाही चर्चेचा विषय बनला आहे. सोनिया गांधी चौथ्यादा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार की, प्रियंका गांधींना मैदानात उतरवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यामुळे सध्यातरी रायबरेलीतून सोनिया की प्रियंका ? हा प्रश्न दिल्लीतील काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात असून या उत्तराची प्रतिक्षा सर्वांनाचा लागून राहिली आहे.