नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर तयार करण्यात आलेल्या मीममुळे मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या प्रियंका शर्मा यांनी ते मीम तयार केले होते. त्याच प्रियंका शर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉलो केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा राजकीय वाद-विवाद रंगण्याची शक्यता आहे.
प्रियंका शर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर फॉलो केले. त्यानंतर प्रियंका यांनी मोदींना टॅग करत त्यांचे आभार मानले. प्रियंका शर्मा यांनी म्हटले की, ही माझ्यासाठी ही आश्चर्याची बाब आहे. मला फॉलो करण्यासाठी नरेंद्र मोदीजी धन्यवाद. हा माझा सन्मान असून मला गौरवास्पद वाटत असल्याचे प्रियंका म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रियंका शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांचं वादग्रस्त मीम तयार केले होतं. तसेच ते सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर टीएमसी नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांना ममता यांची प्रतिमा खराब करण्याचा आरोपात अटक केली होती. तेव्हा कनिष्ठ न्यायालयाने प्रियंका यांना जामीन नाकारला होता. परंतु, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रियंका शर्मा यांना मुक्त करण्याचे आदेश दिले होते.