भवानीपूर: गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. अखेर या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे. यानंतर आता ममता दीदींनी मुख्यमंत्रीपद कायम राखल्याचे सांगितले जात आहे. भाजपने प्रियंका टिबरेवाल यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. यानंतर पहिली प्रतिक्रिया देत मीच मॅन ऑफ द मॅच असल्याचे प्रियंका टिबरेवाल यांनी म्हटले आहे. (priyanka tibrewal bjp contestant said i am the man of the match bhawanipur by election result)
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. मे महिन्यात नंदीग्राम मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरीदेखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणे गरजेचे होते. अखेर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथून विजय मिळवत मुख्यमंत्रीपद कायम राखले आहे.
मीच मॅन ऑफ द मॅच
भवानीपूर पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रियंका टिबरेवाल म्हणाल्या की, मीच मॅन ऑफ द मॅच झाले आहे. अजून खूप आयुष्य आहे. ही लढाई सुरूच राहणार आहे. राजकीय विश्लेषक म्हणत होते की, जेव्हा एखादा सामना होतो, तेव्हा एक संघ जिंकतो, तर दुसरा संघ पराभूत होतो. तसाच हा सामना झाला. जिंकलेल्या सामन्यातील खेळाडूच मॅन ऑफ द मॅच होतात असे नाही. त्यामुळे मीच मॅन ऑफ द मॅच आहे. मी सिद्ध करून दाखवलंय, अशी प्रतिक्रिया प्रियंका टिबरेवाल यांनी दिली.
दरम्यान, तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला होता की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत. हा दावा खरा ठरला. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा अधिक फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत.