सिनेमागृहांत तोडफोड : मुंबईसह देशातील अनेक शहरांत निदर्शनेअहमदाबाद/भोपाळ : आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला व प्रदर्शित होण्याआधी पोस्टरवरील आक्षेपार्ह छायाचित्रामुळे वादग्रस्त ठरलेला ‘पीके’ हा नवा हिंदी चित्रपट हिंदुत्ववाद्यांच्या रोषाला बळी पडला आहे. या चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी काही दृश्ये असल्याच्या कथित कारणावरून त्यावर बंदी घालण्याची मागणी करीत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी देशभरातील काही सिनेमागृहात तोडफोड करून या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. मुंबईसह अहमदाबाद, जम्मू, उत्तर प्रदेश, भोपाळ व आग्रा येथील सिनेमागृहांत घुसून या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली, सिनेमाचे पोस्टर्स जाळले व आमिर खानविरोधी घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. हा चित्रपट देशातील अनेक सिनेमागृहात दाखविला जात असून त्याने आतापर्यंत २०० कोटींचा गल्ला जमविल्याचे सांगितले जाते. दक्षिण मुंबईतील लोअर परेल येथे या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले. अहमदाबादेत बजरंग दलाचे शहरप्रमुख ज्वलित मेहता यांच्या नेतृत्वात २० कार्यकर्त्यांनी आश्रम मार्गावरील सिटी गोल्ड व शिव या सिनेगृहांवर हल्ला चढवून या सिनेमाचे पोस्टर्स फाडले व तिकिटाची खिडकी तोडून टाकली. या हल्ल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. या चित्रपटात काम करणाऱ्या आमीर खानचे ती दृश्ये साकारतानाचे हेतू जर स्वच्छ होते तर त्याच्या स्वत:च्या इस्लाम धर्माविषयी चित्रपटात काही का दाखविले नाही, फक्त हिंदू देवांचेच वाईट चित्रण का केले, असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला आहे. खेडा जिल्ह्यातील नाडियाद येथील तीन सिनेगृहांसमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी त्यांनी सिनेमाचे पोस्टर्स जाळले व आमीर खानविरोधी घोषणा दिल्या. सुरेंद्रनगर शहरातील मीलन सिनेगृहात, आग्रा येथील श्री टॉकीजमध्ये घुसून या कार्यकर्त्यांनी सिनेमाचे पोस्टर्स फाडले व आमीर खानविरुद्ध घोषणा दिल्या. जम्मूमध्येही या चित्रपटाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. बजरंग दलाचे समन्वयक राकेश कुमार यांच्या नेतृत्वात १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.उत्तर प्रदेशातील मऊ येथेही निदर्शने करण्यात आली. येथील हिंदू युवा वाहिनीने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भोपाळमधे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पीके’ या चित्रपटाचे पोस्टर्स फाडले व ज्योती सिनेगृहाबाहेर निदर्शन केली. आम्ही हा चित्रपट दाखवला जाऊ नये, असे या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला कळविले होते. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही.कुणालाही आम्ही हिंदूंच्या भावना दुखावू देणार नाही, असे बजरंग दलाचे मध्य भारताचे संयुक्त समन्वयक कमलेश ठाकूर यांनी सांगितले. महाराणा प्रतापनगरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश भार्गव यांनी याप्रकरणी कुणालाही अटक झाली नसल्याचे सांगितले. या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले जाणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)पीकेविरुद्ध संताप... आमिर खान नायक असलेल्या पीके या चित्रपटाच्याविरुद्ध सोमवारी भोपाळमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. (इन्सेटमध्ये) अहमदाबादेत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पीकेविरुद्धचा राग सोमवारी चित्रपटगृहाची मोडतोड करून व्यक्त केला.आमिर खानने फेटाळला आरोपआमिर खानने याआधीच त्याच्यावर झालेला अशाप्रकारचा आरोप फेटाळून लावला आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. माझ्या सर्व हिंदू मित्रांनी हा चित्रपट पाहिला असून, त्यांना त्यात काही वावगे वाटले नाही. चित्रपटाच्या निर्मितीमधील ९९ टक्के लोक हे हिंदू आहेत, त्यांच्यापैकी कोणीही या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतला नाही, असे आमिरने म्हटले आहे.
‘पीके’वर हिंदुत्ववाद्यांचा हल्ला
By admin | Published: December 30, 2014 2:14 AM