नवी दिल्ली : भारतीय शेतीची जीवनरेखा असलेल्या मान्सूनला यंदा अल निनोचा धोका असला तरी त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात जाणवण्याची शक्यता असल्याने त्याची भारताने चिंता करण्याचे कारण नाही, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.साधारणत: १ जूनला मान्सूनचे केरळात आगमन होते. उत्तरेकडे प्रवास करीत करीत सप्टेंबरमध्ये तो राजस्थानमध्ये पोहोचतो. भारतातील संपूर्ण शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. यंदा प्रशांत महासागरात अल निनो प्रवाह तयार होणार असल्याने मान्सूनवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तथापि, भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी सांगितले की, अल निनोची आम्हाला या क्षणी चिंता नाही. अल निनोचा प्रभाव अखेरीस जाणवू शकेल. मान्सूनच्या अखेरीस प्रभाव दाखविणाऱ्या अल निनोमुळे मान्सूनची सुरुवात कमजोर होईल, अथवा पाऊस कमी पडेल असे कोणतेही संकेत नाहीत. नैर्ऋत्य मान्सूनवर परिणाम करणारे असंख्य घटक आहेत. त्यातील एक घटक म्हणजे अल निनो होय. तेवढेच त्याचे महत्त्व आहे.अमेरिकेच्या हवामान खात्याने या महिन्याच्या सुरुवातीला हवामानाचा अंदाज देताना ‘ला निना’ स्थिती संपली असून या वर्षात नंतर ‘अल निनो’ विकसित होणार आहे, असे म्हटले होते. जपान आणि आॅस्ट्रेलिया यांनीही अल निनोची शक्यता ४0 ते ५0 टक्के असल्याचे म्हटले होते.रमेश यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ला निनाचा प्रभाव होता. तरीही भारतात काही तुफान पाऊस पडला नाही. पावसाचे प्रमाण सरासरीच राहिले. यावरून अल निनो आणि ला निना या दोन्ही सागरी प्रभावाचा परिणाम हा मर्यादितच असतो, हे दिसून येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे अल निनो आणि ला निनाअल निनोचा प्रभाव असेल, तेव्हा नैर्ऋत्य मान्सून कमजोर असतो, असे मानले जाते. या भागातील सागरी पृष्ठभागाचे तापमान जेव्हा कमी होते, तेव्हा त्यास ला निनो म्हणता. ला निनोच्या प्रभाव काळात प्रचंड पाऊस पडतो, असे मानले जाते. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमानात चढ-उतार होत असतात. पूर्व आणि मध्य प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा वाढते तेव्हा त्याला अल निनो म्हणतात.
मान्सूनवर ‘अल निनो’च्या प्रभावाची शक्यता कमीच
By admin | Published: March 26, 2017 12:39 AM