ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्या-या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) भारतानं दाखल केलेल्या याचिकेवर 15 मे (सोमवारी) रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी ही माहिती दिली आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना साळवे यांनी सांगितले की,"आम्हाला सोमवारी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. सोमवारी सुनावणी होऊ शकते किंवा सुनावणीच्या तारखेसंबंधी माहिती मिळू शकते." साळवे यांनी असेही सांगितले की, जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांना वकिलांची मदत घेणे हा भारत तसंच भारतीय अधिका-यांचा अधिकार आहे.
दरम्यान, भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी बुधवारी चर्चा केली. 90 मिनिटे चाललेल्या या चर्चेत जाधव प्रकरणाशी संबंधित ताज्या परिस्थितीची माहिती शरीफ यांना देण्यात आली. जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून मृत्यूदंड ठोठावला आहे.
पाकचा तोरा कायम; म्हणे योग्य पायरीवर उत्तर देऊ
जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कोणत्याही प्रश्नाला ‘योग्य पातळीवर’ उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी येथे म्हटले. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कायद्याची योग्य पद्धत अवलंबल्यानंतरच जाधव यांना लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांच्याबद्दल आयसीजेने पाकिस्तानला कोणतीही विनंती केली, तर आमचे सरकार योग्य पातळीवर त्याला प्रतिसाद देईल.’ जाधव यांच्या फाशीला आयसीजेने स्थगिती दिल्यानंतर लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्यानंतर लष्कराने वरील वक्तव्य केले.
पाकिस्तानात भारत घडवून आणत असलेल्या दहशतवादावरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भारत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा वापर करीत आहे, असे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले होते. आयसीजेचा अधिकार पाकिस्तानवर नाही. आयसीजे संबंधित पक्षांच्या संमतीनंतरच विषय हाती घेऊ शकते, असे जीओ टीव्हीने म्हटले. ‘डॉन’ने ऑनलाईनवर आयसीजेकडे भारताचा अर्ज आल्याचे वृत्त दिले; परंतु फाशीला स्थगिती मिळाल्याचा भारताचा दावा वृत्तात दिलेला नाही.
‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’नेही आपल्या बातमीत भारताने स्थगिती मिळाल्याच्या केलेल्या दाव्याचा उल्लेख केलेला नाही. भारताने आयसीजेने जाधव यांच्या फाशीला दिलेल्या स्थगितीवर मोकळा श्वास घेतला असला तरी भूतकाळ आणि पाकिस्तानसोबतचे ताणले गेलेले संबंध जाधव यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात अडथळा ठरू शकतात. भारताने पूर्वी दोन देशांतील वादात आयसीजेच्या अधिकाराबद्दल प्रश्न विचारला होता. पाकिस्तान आयसीजेचा आदेश स्वीकारील का? तांत्रिकदृष्ट्या तो त्याने स्वीकारला पाहिजे; परंतु भूतकाळाकडे पाहिले तर तसे होण्याची शक्यता नाही. राष्ट्रकुलातील दोन देशांचा संबंध असलेल्या प्रकरणात आयसीजेला अधिकार नाही, असा युक्तिवाद भारताने पाकिस्तानविरोधात करून ते प्रकरण जिंकले होते.
‘आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे विचारपूर्वक होते’
कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी येथे म्हटले.
आयसीजेने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला मंगळवारी स्थगिती दिली. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांनी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी 16 वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.