'लोकसभा निवडणुकांत समाजमाध्यमांमुळे ४ ते ५% मते फिरण्याची शक्यता'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:42 AM2019-03-13T06:42:21+5:302019-03-13T06:42:55+5:30
लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.
हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, युवक विशेषत: जे या निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत ते समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. त्यातून त्यांना एखादा पक्ष किंवा उमेदवार यांच्याविषयी प्राथमिक माहिती मिळते. पै हे इन्फोसिस या कंपनीचे माजी मुख्य वित्त अधिकारी आहेत. ते म्हणाले की, समाजमाध्यमांतून मिळणाऱ्या माहितीद्वारे आपले विचार पक्के करून युवा मतदारांपैकी ४० ते ५० टक्के लोक त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतील. सध्याचे युवक हे टीव्ही न पाहाता व्हिडीओ पाहातात. त्यासाठी ते यू ट्युब, समाजमाध्यमांचा वापर करतात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत. समाजमाध्यमांवर जे दिसते त्याने युवक प्रभावित होतात. त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध मार्ग शोधले पाहिजेत. हे युवक कोणत्या गोष्टींतून प्रेरणा घेतात, त्यांना नेमके काय भावते, कोणत्या ठिकाणी जास्त जायला आवडते, ते आपल्या भविष्याबद्दल काय विचार करतात अशा अनेक गोष्टींचा मागोवा राजकीय पक्षांनी घ्यायला हवा.
त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना राजकीय पक्षांनी संदेश पाठविले पाहिजेत. युवकांतील विशिष्ट गटांना डोळ््यांसमोर ठेवून संदेशांची रचना केली पाहिजे. ते संदेश उज्ज्वल भविष्याविषयी सकारात्मक भाष्य करणारे असावेत.
राहुल गांधींच्या तोंडी १९९०च्या दशकातील भाषा
टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर भारताला कशी वागणूक मिळते याविषयी युवकांना जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. त्यांना परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करायचा असतो. जगामध्ये भारताचे स्थान उंचावण्यासाठी सरकारने केलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या कहाण्या जर संदेशरुपात राजकीय पक्षांनी युवकांना पाठविल्या तर ते युवकांना नक्कीच आवडेल. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात भाजप सर्व राजकीय पक्षांमध्ये आघाडीवर आहे. १९९०च्या दशकात वापरली जाणारी भाषा राहुल गांधी यांच्या तोंडी असल्याने ते युवकांमध्ये फारसे लोकप्रिय नाहीत असेही पै म्हणाले.