नवी दिल्ली-
मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विचारण्यात आलं असता मोदींनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. देशात निवडणुका निर्धारित वेळेनुसार होत असतात आणि तपास यंत्रणा देखील त्यांच्या नियम व कायद्यानुसारच काम करत असतात. भ्रष्टाचारामुळे देशाचं खूप नुकसान झालं आहे आणि जर भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करून देशाच्या संपत्तीत भर पडत असेल तर उलट याबाबत केंद्र सरकारचं कौतुकच केलं गेलं पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम नियम व कायद्यानुसार करत असतात. त्यात केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही असं सांगतानाच पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. "भ्रष्टाचाराची वाळवी देशाला पोखरून काढत आहे. भ्रष्टाचाराविरोधात जनतेनं आवाज उठवला नव्हता का? मी जर जनतेनं उठवलेल्या आवाजासाठी काहीच केलं नाही तर मला जनता माफ करेल का? ज्या ज्या वेळी सरकारला भ्रष्टाचाराविषयीची माहिती मिळते तेव्हा मग कारवाई करायची नाही का? आणि जर भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करुन कोट्यवधी रुपये देशाच्या तिजोरीत जमा होत असतील तर खरंतर सरकारचं कौतुकच करायला हवं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"निवडणुका देशात होत असतात मग अशावेळी काय सरकार काम करणं बंद करतं का? निवडणुका पाच वर्षातून एकदाच होत असतात आणि त्यास सर्व पक्ष एकत्रितरित्या सामोरं जातात. सर्व राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीला एकत्रं सामोरं जातात. त्यामुळे अशावेळी ईडी आणि सीबीआयचा मुद्दा राजकारणाचा विषय ठरू शकत नाही. तपास यंत्रणा त्यांच्या टाइमटेबल नुसार काम करत असतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे ते काम करत असतात. यात केंद्राचा कोणताही सहभाग नसतो", असंही मोदींनी म्हटलं.